कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एको टॅक्सी आणि सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून दोन जण गंभीर जखमी असल्याचे समजते. मृत सर्वजण मुरबाड तालुक्यातील रहिवासी असून, ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. पुलावर एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतदेह गोविली ग्रामीण रुग्णालयात आणल्याचेही समजते. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, घाईघाईत पूल सुरू करण्यात आल्याने आणि योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर केले आहेत.
तसेच, एको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहितीही समोर येत आहे. यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, "एनए ६१ कल्याण - अहिल्यानगर मार्गावर १०.४५ वाजण्याच्या सुमारास एक एको आणि टाटा मिक्सर यांचा अपघात झाला. यात एकोमधील मृतांना गोविली रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. ११ जणांचा मृत्यू झाल्येच समजते."