नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या पेठ परिसरातील प्रसिद्ध सावळाराम घाटात दोन ट्रक आणि एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अत्यंत दुर्दैवी अपघातात कारमधील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
तीव्र वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावळाराम घाटातील एका अत्यंत तीव्र आणि धोकादायक वळणावर हा अपघात घडला. घाटातून जात असताना एका अवजड ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला. ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि हा अनियंत्रित ट्रक थेट पुढे जाणार्या वाहनांवर आदळला. घाटात उतार आणि तीव्र वळण असल्याने ट्रकचा वेग प्रचंड होता, ज्यामुळे चालकाला गाडी थांबवणे अशक्य झालं.
दोन ट्रकच्या मध्ये सापडून कारचा चक्काचूर
हा अपघात इतका भीषण होता की, ब्रेक फेल झालेला ट्रक आणि आणखी ट्रक या दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये ही कार अडकली. यामुळे दोन अवजड वाहनांच्या मध्ये कार अक्षरशः चिरडली गेली. या भीषण अपघातात कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलीस प्रशासन आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी हजर असून, मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
घाटातील वाहतूक विस्कळीत
या भीषण अपघातामुळे सावळाराम घाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली असून, वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.