जयपूर : खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्राकडे परतत असलेल्या एका कुटुंबाचा शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ९ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमींवर सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शनावरून परतताना, रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून मदतीसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचे पायही थरथर कापल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सदस्य
भाविकांच्या क्रूझर वाहनाने ट्रकला जोरदार धडक दिली. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. शंभूपुरा गावाजवळ नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अपघातात नऊ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. वाहनात एकूण १६ जण होते आणि सर्व महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील होते. अपघातामधील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी काय म्हणाले?
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी म्हणाले की, शंभूपुरा जवळ, मध्यरात्री १६ जणांना घेऊन जाणारे एक वाहन ट्रकवर आदळले. हा अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अपघात होता, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण खाटू श्यामच्या दर्शनानंतर महाराष्ट्रात परतत होते. ते सर्व एकाच कुटुंबातील होते. सध्या आमचे प्राधान्य जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देणे आणि ते बरे व्हावेत हे सुनिश्चित करणे हे आहे. दरम्यान, अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन (पोस्ट-मॉर्टम) करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्याची नावे
१) सजन दौलत पवार २) उषाबाई सजन पवार ३) माधवी गणेश पवार ४) साऊ गणेश पवार ५) कैलास भगवान पवार ६) अनिता कैलास पवार ७) जानवी कैलास पवार ८) बाबूलाल दौलत पवार ९) सुशीलाबाई बाबुलाल पवार
अपघातातील जखमी व्यक्तींची नावे
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये मनीषा शरद पवार (वय ४१ वर्षे), मयुरी शरद पवार (वय २० वर्षे), जगदीश कैलाश पवार (वय १० वर्षे), श्रीजीत गणेश पवार (वय ४ वर्षे), शरद बाबूलाल पवार (वय ४५ वर्षे) आणि गणेश सय्यद पवार (वय ३२ वर्षे) यांचा समावेश असून त्यांच्यावर कोटा येथील रुग्णालायात उपचार करण्यात येत आहे.