रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या एका भरधाव कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. लांजा रेस्ट हाऊसजवळ झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील मृत आणि जखमी कुटुंब मुंबईतील आग्रीपाडा भागातील रहिवासी आहे. हे कुटुंब गोव्यामध्ये सुट्ट्या घालवून कारने मुंबईला परतत होते. लांजा रेस्ट हाऊसजवळ आले असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर जाऊन मागून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्दैवी अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली. लांजा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मुंबईतील आगरीपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.