नवी दिल्ली : मेक्सिकोतील एका गावातील उत्सवादरम्यान बर्निंग बुल सोबत सुरू असलेल्या जल्लोषाच्या क्षणाचं भीषण दुर्घटनेत रूपांतर झालं. फटाक्यांनी सजवलेल्या गवताच्या बैलाला (पुतळ्याला) आग लागल्यानंतर जवळच ठेवलेल्या फटाक्यांमध्ये जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी मेक्सिकोतील तेमास्कालसिंगो नगरपालिका हद्दीतील सांता मारिया कांचेस्डा येथे ही दुर्घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नागरिक गवतापासून बनवलेल्या बैलाला घेऊन जाताना दिसत आहेत. या बैलावर आणि आसपास अनेक फटाके लावण्यात आले होते, ज्यातून आतिशबाजी सुरू होती. हा सोहळा तेथील स्थानिक परंपरेचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे.
बर्निंग बुलमुळे फटाक्यांच्या साठ्याने घेतला पेट
मिळालेल्या माहितीनुसार, गवताच्या बैलावर केलेल्या आतिशबाजीमुळे गावातील चर्चमध्ये ठेवलेल्या फटाक्यांच्या मोठ्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर अत्यंत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, आसपासच्या भिंती कोसळल्या आणि गावातील मुख्य चौकात सर्वत्र आग पसरली.
स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर काही नागरिक ढिगार्याखाली अडकले होते. मदत व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढलं. मेक्सिकोच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू करण्यात आला आहे.
जुलै २०१८ मध्ये मेक्सिको सिटीच्या उत्तरेस असलेल्या तुलतेपेक शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन वर्षांपूर्वी याच शहरातील फटाक्यांच्या बाजारात झालेल्या स्फोटात ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.