मुंबई : नवी मुंबईजवळील बदलापूरमध्ये एका आलिशान बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्रांसोबत हाय-स्पीड ड्राईव्हवर गेलेल्या तीन तरुणांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांतच एका भयंकर अपघातात बदलला. मुंबई-बडोदा महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि मृतदेहांचे अवयव दूरवर विखुरले गेले. अपघाताच्या वेळी कारचा वेग तब्बल २५० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
योगेश नेगी (वय २६, रा. बदलापूर) आणि रेबेका जेकब (वय -२४, रा. वांद्रे) असे अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. योगेशचा वाढदिवस असल्याने त्याने बदलापूर पश्चिमेला मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर रविवारी, २१ जूनच्या मध्यरात्री योगेश, रेबेका आणि कारचा मालक अंगद हे तिघेही निर्माणाधीन असलेल्या मुंबई बडोदा एक्स्प्रेसवेवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार टिटवाळ्याहून बदलापूरच्या दिशेने येत होती. एरंजाड परिसराजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार अनेक वेळा पलटी खात रस्त्यावर घासत गेली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास बीएमडब्ल्यू एक्स्प्रेसवेवर अतिशय वेगाने धावत होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार दोनदा खूप वेगाने निघून गेली. तिसर्या वेळी एका मोठ्या स्फोटासारखा आवाज आला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. एक तरुणी कारमधून उडून खूप दूर जाऊन पडली होती आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
चालक बचावला, पोलिसांचा तपास सुरू
या दुर्दैवी घटनेत योगेश आणि रेबेका यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंगद नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम त्वरित तिथे पोहोचली असून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत असावा असा संशय आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. कार २५० हून अधिक वेगाने चालवणे, निष्काळजीपणा की आणखी काही कारण... या भीषण अपघाताचे खरे कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. एवढ्या भीषण धडकेत अंगद कसा बचावला, एअरबॅग उघडल्या होत्या की आणखी काही कारण होते, याचाही पोलीस शोध घेत आहेत. अंगदचा जबाब नोंदवल्यानंतरच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होऊ शकेल. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.