घर फोडले ः दागिन्यांसह रोख रक्कम पळवली

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कुटुंबीय लग्नसोहळ्यासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. ही घटना येथील भगतसिंगनगर येथे बुधवारी (दि.१८) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून नेमका किती मुद्देमाल चोरट्यांनी पळवला है अद्याप समोर आलेले नाही. सय्यद मन्सूर हे आपली दोन मुले, पत्नी व सुनांसह येथे राहतात. मंगळवारी त्यांच्या नातेवाइकाच्या मुलीचा साखरपुडा असल्याने सर्व कुटुंबीय गावाकडे गेले होते. ऐनवेळी साखरपुड्यातच लग्न लावण्यात आल्याने रात्री त्यांना उशीर झाला. त्यामुळे सर्वजण गावाकडेच थांबले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. बुधवारी सकाळी शेजार्‍यांना सय्यद यांच्या घराची अर्धवट कडी लावलेली दिसली. त्यांना वाटले की, सय्यद कुटुंबीय रात्री परत आले. 
घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना घरातील सर्व साहित्य, कपडे अस्ताव्यस्त व कपाट उघडे दिसले. दरम्यान, घरफोडी झाल्याचे समजताच त्यांनी सय्यद मोईन मन्सूर यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलीस अंमलदार सुखदेव भागडे, बी. एम. शेळके, एस. बी. कटारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक लॅब व डॉग्स पथकाला पाचारण करून चोरट्याचा माग काढण्यात आला