गंगापूर तालुक्यातील दिघी येथील घटना; वाळूज पोलीस ठाण्यात तपास सुरू
गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील दिघी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोने-चांदीच्या वस्तूंसह तब्बल ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या चोरीमध्ये अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
सोन्या शिवाजी साधे यांच्या दिघी येथील घरात रात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. घरातील सोने व चांदीच्या काही वस्तू तसेच रोख ७० हजार रुपये चोरून चोरटे पसार झाले.
सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वाळूजचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे दिघी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.













