मिसिंग लिंकवरुन प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला ? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Foto
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेतील भाषणात मिसिंग लिंकवरुन राजकारण करु नका असे सांगितले. वा रे वा, त्याचं राजकारण करु नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण, आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वत:च्या अंगाशी  आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते गुरुवारी मुंबईतील मनसे  रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या दुर्घटनेवरुन राजकारण करुन महाराष्ट्राचा अपमान करु नका, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. 

मुख्यमंत्री विधानसभेत काय बोलतात,'एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. लोक मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? पण केंद्र सरकारविरोधात काही बोललं तर देशविरोधी ठरवलं जातं, मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. आता सरकारला ज्या शिव्या घातल्या आहेत, ते गेली अनेक वर्षे तुमच्याकडूनच सुरु होते. विरोधकांना वाटेल ते बोल, शिव्या घाल, हे तुमच्याकडूनच सुरु होते. आता या गोष्टी अंगलट येऊ लागल्यावर  आणि सगळं अंगावर आल्यावर तुम्हाला त्रास होऊ लागला आहे. पण या सगळ्या गोष्टी आपणच सुरु केल्या होत्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की, मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे बांधकाम आहे. यावरुन राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ. अरे तू मुख्यमंत्री आहेस ना, बघून घेऊ काय? हे सगळे बोलल्यानंतर मुख्यमंत्री अचानक हिंदीतून बोलायला लागले. ते कोणासाठी हिंदीत बोलत होते, समोरचे आमदार मराठी, विधानसभा महाराष्ट्राची आणि आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. हे कशासाठी आणि कोणासाठी होतं? कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल, तुम्हाला बघून घेईन. त्यांनाही माहिती आहे, हे सगळे व्हिडीओ कुठून येत आहेत? भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर घमासान सुरु आहे, फक्त पाहत राहा आगामी काळात काय होते?, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा विचका केलाय...
मुंबई, महाराष्ट्र आणि ठाण्यात विचका झाला आहे, त्याला हे सरकार विकास बोलत आहे. बघावं तिकडे इमारती सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी सगळी बांधकामं बंद करुन टाकावीत. नुसते रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हते. हे लोक परदेशात जाऊन काय शिकून येतात, हेच मला समजत नाही. मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मे रोजी झाले.  आता जुलै महिन्यात त्यामधून पाणी वाहतंय, 60-65 दिवसांत नवा टनेल गळायला लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनावेळी मिसिंग लिंकसाठी सामान वेगवेगळ्या देशातून आणलं आहे, हे सांगत होते. पण हे सगळं भारतीय कंत्राटदाराकडे दिलं की, ते करायचं तेच करतात. काही कंत्राटदार सांगत आहेत की, त्यांना मिळणाऱ्या कंत्राटातील 56 टक्के पैसे सरकारमधील लोकांना द्यावे लागतात. मग त्यांना 44 टक्क्यात काम करावे लागते, मग तुम्हाला असेच रस्ते मिळणार ना?, असे राज ठाकरे यांनी म्हटले.