४० मिनिटात ७ दिवसांचे पाणी कसे साठवायचे? सिडकोतील नागरिकांचा संतप्त सवाल

Foto

औरंगाबाद : शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, शहरभर पाण्यासाठी नागरिकांकडून ओरड केली जात आहे. त्यातच जायकवाडी धरणातून होणारा पाणीपुरवठा कमी झाल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. सिडको- हडको सह अन्य काही वसाहतीत पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अनेक वसाहतीत तर सातव्या- आठव्या दिवशी पाणी येत आहे. त्यातही कमी दाबाने व केवळ चाळीस मिनिटे पाणी येत असल्याने चाळीस मिनिटात पाणी कसे साठवायचे? असा सवाल परिसरातील संतप्त नागरिक व नगरसेवकांकडून व्यक्त केला जात आहे

उन्हाळा सुरु होताच शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवायला लागली आहे. त्यातच जायकवाडी कडून  शहरात येणारे पाणी २० एमएलडीने कमी झाल्याने यात आणखी भर पडली आहे. अनेक वसाहतींना तर सात ते आठ दिवसानंतर पाणी येते. विशेषतः सिडको-हडकोत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी तर पाण्याकरिता विविध आक्रमक आंदोलनेही पाहायला मिळाली.  आज घडीला दिवसाकाठी मनपा मुख्यालय, पाण्याच्या टाकी आदी ठिकाणी मोर्चा, निदर्शने, टँकर अडवून  नागरिक आपला संताप व्यक्त करीत आहे.  गुलमोहर कॉलनी, एन -५,एन-२ आदींसह  अनेक वसाहती मध्ये तर सातव्या-आठव्या दिवशी पाणी येत आहे. त्यातही कमी दाबाने व ४० मिनिटेच पाणी येत असल्याने ७ दिवसांचे पाणी कसे साठवायचे? असा सवाल परिसरातील नागरिक व नगरसेवकाकडून  व्यक्त केल्या जात आहे. त्यातही कमी दाबाने पाणी येत असल्याने घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत देखील पाणी पोहोचत नाही. गेल्या अनेक महिन्या पासून हा त्रास  नागरिक सहन करीत आहे. परंतु प्रशासन या बाबतीत संवेदनशील नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या त्रासापासून आमची मुक्तता केव्हा होणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.

काय म्हणतात अधिकारी
संपूर्ण वसाहतींमध्ये ५० ते ६० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. कमीत कमी ५० मिनिटे तरी पाणी सोडले जाते. पूर्णवेळ व्यवस्थित दाबाने पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी संबंधितांच्या नळाचा प्रॉब्लेम असू शकतो.
एम.बी.काझी, सहायक अधिकारी, पाणीपुरवठा