नाशिक : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणी आणि महिलांना जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण, विनयभंग आणि धर्मांतर करण्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका नामांकित कंपनीच्या आडून सुरू असलेल्या या 'जिहादी' मानसिकतेच्या कृत्याचा नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि धाडसी पद्धतीने तपास करून छडा लावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून, यात दोन महिलांचाही समावेश आहे.
असे चालायचे षडयंत्र
बेरोजगार तरुणींना आकर्षक पगाराचे आमिष दाखवून या कंपनीत नोकरीला ठेवले जात असे. कॉल सेंटरप्रमाणे काम करून घेताना टीम लीडरच्या माध्यमातून या तरुणींवर पाळत ठेवली जात होती. विश्वास संपादन केल्यानंतर विशिष्ट विचारधारेच्या नराधमांकडून तरुणींचा मानसिक छळ, विनयभंग आणि लैंगिक शोषण सुरू झाले. या शोषणामागचा मुख्य उद्देश या तरुणींचे धर्मांतर करणे हाच होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
महिला पोलिसांचे 'अंडरकव्हर' ऑपरेशन
या छळाला कंटाळलेल्या एका धाडसी तरुणीने थेट नाशिक पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 जणांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी स्वतःची ओळख लपवून या कंपनीत नोकरी मिळवली. आठ दिवस त्यांनी तिथे काम शिकले आणि आरोपी कशा प्रकारे मीटिंगमध्ये मुलींवर दबाव टाकतात, त्यांचे शोषण करतात याचे ठोस तांत्रिक पुरावे गोळा केले.
पोलिसांची मोठी कारवाई आणि धक्कादायक खुलासे
पुराव्यांची साखळी पूर्ण झाल्यावर पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून सहा जणांना बेड्या ठोकल्या. एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत, तर एका पुरुषाने धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. 6 अविवाहित तरुणी आणि 2 विवाहित महिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित तरुणींनी या प्रकाराबाबत कंपनीच्या HR विभागाला वेळोवेळी कल्पना दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेऊन 4 तास चौकशी केली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता
"हा प्रकार अतिशय गंभीर असून, पोलिसांनी विशेष पथकामार्फत पुरावे गोळा केले आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त केले असून तांत्रिक तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे," अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे.
एक महिला आरोपी फरार
सध्या पाच आरोपी पोलीस कोठडीत असून एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.