छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दोन मुलींनंतर तिसर्यांदाही पदरात मुलगीच पडणार असल्याचे समजताच सासरच्या मंडळींनी बोगस डॉक्टरांच्या मदतीने एका विवाहितेचा घरातच गर्भपात केला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरा फेरोज मन्सूर सय्यद यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी शुक्रवारी (दि.१३) सांगितले.
पीडित विवाहितेला पाच आणि दोन वर्षांच्या दोन मुली आहेत. ती तिसर्यांदा पाच महिन्यांची गरोदर असताना, पती अरबाजने जालन्याचा सतीश सोनवणे, कमळ गोकूळ तिनगोटे व अन्य एका पुरुषाला घरी बोलावले. याच टोळक्याने घरीच तिची बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली. गर्भात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच आरोपींनी विवाहितेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून बळजबरीने गर्भपात केला.












