छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखालील खटल्यात ठोस व विश्वासार्ह पुरावा सादर करण्यात अभियोग पक्ष अपयशी ठरल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी हर्षवर्धन भाउसाहेब साळवे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८-अ, ३०४-ब व ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीकडून पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ होत असून त्यातून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. संबंधित महिलेने २५ नोव्हेंबर २०१८ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान साक्षीदारांचे जबाब, तपासातील त्रुटी आणि सादर पुरावे यांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट नमूद केले की, कथित छळाबाबत ठोस, सातत्यपूर्ण व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा थेट संबंध किंवा निकटचे कारण सिद्ध करण्यात अभियोग पक्ष अपयशी ठरला. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, केवळ कौटुंबिक वाद किंवा किरकोळ भांडणांच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही. त्यासाठी आरोपीकडून हेतुपुरस्सर व थेट कृती सिद्ध होणे आवश्यक आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. गोविंद एम. शर्मा यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी स्पष्ट हेतू व थेट कारणसंबंध आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













