वैजापूर, (प्रतिनिधी) : जवळील जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावर टोल नाक्याजवळ मुंबईहुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव क्रेटा वाहनाने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील वास्तुविशारद यांचा मृत्यू झाला. पवन वर्धमान अजमेरा (५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी, मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
संभाजीनगर येथील प्रसिद्ध वास्तुविशारद पवन वर्धमान अजमेरा (५२) हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या चारचाकीने (एम एच २० ४५२७) गाडीने मुंबई येथे गेले होते. सोमवारी (दि. १३) रात्री मुंबई हुन संभाजीनगर येथे परत येत असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या च्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीने एका ट्रक ला मागून जोराची धडक दिली.
अपघात इतका भीषण होता कि ट्रकने गाडीला १०० फूट ओढत नेले. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील सुरक्षा कर्मचारी व समृद्धी महामार्ग फायर ब्रिगेड यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. जखमींना बाहेर काढले.
परंतु पवन अजमेरा यांचे पाय गाडीमध्ये अडकल्याने त्यांना गाडीमधून बाहेर काढता आले नाही. एका क्षणात गाडीने पेट घेतल्याने गाडीचा मोठा भीषण स्फोट झाला. आगीच्या भीषण स्फोटामध्ये पवन अजमेरा यांचा जागेवरच कोळसा झाला. फायर ब्रिगेडने आग विझवत पवन अजमेरा यांच्या मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
अपघातानंतर संबंधित ट्रक चालक जागेवरून ट्रकसह पसार झाला आहे वैजापुरात प्राथमिक उपचार करून पवन अजमेरा यांच्या पत्नी विना पवन अजमेरा (४७), ईशा पवन अजमेरा (२०) असे जखमी झालेल्यांची नावे आहे. दोन्ही जखमीना संभाजीनगर येथे पुढील उपचारास पाठवले. वैजापूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
वैजापूर पोलीस तपास करत आहेत. वैजापूर येथील अनेक मोठ्या वास्तूंचे बांधकाम पवन अजमेरा यांनी केलेले आहे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळतात वैजापूर शहरातील अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. पवन अजमेरा यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, मुलगी, एक मुलगा आहे. मुलगा सध्या अमेरिका येथे शिक्षण घेत आहे.










