वसई : अध्यात्मिक साधनेच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्या शोधासाठी आता पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याची दोन पथकं वसई-विरारमध्ये दाखल झाली असून माणिकपूर पोलिसांची दोन पथकंही या शोध मोहिमेत सहभागी झाली आहेत. मात्र, या कारवाईदरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पीडित महिलेने बुधवारी सायंकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून झिरो नंबरने प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती....
दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ऋषिकेश वैद्य याने 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी ओळख वाढवली. स्वतःला शंकराचा अवतारफ सांगत आणि महिलेला ङ्गतू माझी पार्वती आहेसफ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुण्यात भेटीत लॉजमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचेही महिलेने सांगितले असून त्यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे. 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी ऋषिकेश वैद्य याने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाहीत, तर पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी धर्माचा आणि अध्यात्माचा आधार घेतला. स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांची दिशाभूल करण्याचा त्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे, गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. या पुराव्यांच्या जोरावर तो 2025 पर्यंत तिला ब्लॅकमेल करत राहिला. सध्या आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्याची मागणी होत आहे. तर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारीच माणिकपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले असते, तर तो फरार होण्याची शक्यता कमी होती. मात्र वेळेत कारवाई न झाल्यामुळे आरोपीला पळ काढण्याची संधी मिळाल्याचा आरोप होत आहे.सध्या आरोपी फरार असून, चार वेगवेगळ्या पोलिस पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील तपास अधिक तीव्र करण्यात आला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एवढ्या गंभीर प्रकरणात सुरुवातीच्या टप्प्यावर झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
दरम्यान, माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र तो अद्याप फरार असून, पुणे पोलिसांचे पथकही त्याच्या शोधासाठी कार्यरत आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे दावे तपासले जाणार आहेत.
झिरो नंबर वर गुन्हा दाखल
पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तेथे आढळून आला नाही. बुधवारी रात्री झिरो नंबरफने गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तातडीने अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांना तो सापडला नसल्याने आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुणे पोलिसांचे पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झाले असून त्याचा शोध सुरू आहे.