नवी दिल्ली, दि.16 (वृत्तसंस्था): आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी ’मैं भी चौकीदार’ या हॅशटॅगसह एक व्हिडीओ ट्विट करत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी ’हा, मैं भी चौकीदार हूँ’ हे गाणेही तयार करण्यात आले आहे.
’चौकीदार चोर हैं’ असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेते गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. राफेल लढाऊ विमान खरेदीतील घोटाळ्यावरून काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कंबर कसली असून, ’चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ’मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात करून दिली.
’तुमचा चौकीदार ठाम असून देशाची सेवा बजावत आहे. पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ या विरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय- मी पण चौकीदार’ असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. या व्हिडिओमध्ये एक गाणे असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभामध्ये लोकांसोबत, रणगाड्यामध्ये दिसतात. या गाण्यात प्रामुख्याने लोकसुद्धा ‘मै भी चौकीदार हूँ’ बोलताना दिसतात.