मुंबई: पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी गोविंद पानसरे यांच शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन स्वागत केलं आहे.
राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही
काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर प्रशांत जगताप यांनी बोलताना म्हटलं की, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्षाचा १३५ वर्षांचा प्रवास आहे. अथांग सागर आहे. पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून इथे दाखल होत आहे. आधीच्या पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. काही वादावादी करून मी बाहेर पडलो नाही. गांधी, नेहरू आणि शिव, शाहू, आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी मी इथे प्रवेश केला आहे. माझी लढाई भाजप विरोधी, संघ विरोधी, आंतकवाद निर्माण करण्याच्या विरोधात आहे. गुन्हेगारीत पहिला नंबर पुण्याचा हे गृहमंत्री सांगतात. भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिला आणि पुणे पहिला आहे,
भाजपच्या ताब्यात पुणे आहे. 26 वर्ष मी त्या पक्षात राहिलो आहे. अनेक चर्चा पक्षांतर्गत झाल्या, मी कधीही माध्यमांना सुद्धा काही सांगितलं नाही. आता देखील मी तेच करेन. पक्षाबरोबर कायम राहून मी काम करेन. भाजपला कोणी टक्कर देऊ शकतो तो पक्ष काँग्रेस आहे. आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून त्या पक्षात तरुण वयात दाखल झालो. राजकारण बंद करेन पण आता काँग्रेसमधून जाणार नाही. कोणाबद्दल दूजाभाव नाही, कोणाशीही वैर नाही. 16 गुन्हे दाखल झाले, राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक आंदोलन मी केली. पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेशी एकरूप राहीन, काँग्रेस कोणताही निर्णय घेईल त्याच्याबरोबर असेन असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्याने प्रशांत जगताप नाराज होते. भाजपची साथ देणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय होत असले तर मी बाजूला होतो, अशी भूमिका घेत प्रशांत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संविधान रक्षणासाठी लढणाऱ्या आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ असलेल्या पक्षात मी प्रवेश करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.