आयआयटी साहिल वाकोडे मृत्यूप्रकरण : प्रा. सूर्यनारायण डुल्लांना सक्तीच्या रजेवर पाठवले, गुन्हे शाखा करणार स्वतंत्र चौकशी

Foto
मुंबई : मुंबई आयआयटी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. साहिल वाकोडेचे वडील रवींद्र वाकोडे यांनी मुंबई आयआयटीतील प्राध्यापकाला अटक करण्याची मागणी केली आहे. प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना अटक व्हावी, अशी साहिलच्या पालकांची मागणी आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांना अल्टिमेटम दिलं होतं. अन्यथा ते मुंबई आयआयटी समोर उपोषणाला बसतील, असा इशारा त्यांनी दिला होता. परिणामी या इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

आपण आंदोलन करू नये, उपोषणाला बसू नये, यासाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन आपल्याला कारंजा येथे आणलं, असं रवींद्र वाकोडे यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे संशयित आरोपी प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला  हे आज मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर राहणार असल्याची माहिती आहे. क्राईम ब्रांचचे तपास अधिकारी त्यांचा या प्रकरणी जबाब नोंदवणार आहे. सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असून साहिल वाकोडे यांच्या पालकांचा काल (२२ सप्टेंबरला) जबाब नोंदवला होता. आता सूर्यनारायण डुल्ला यांचा देखील आज जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, साहिल वाकोडे यांच्या पालकांनी केलेल्या आरोपानंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय मुंबई आयआयटीने घेतला आहे. मुंबई आयआयटीकडून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी दहा सदस्य उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांकडून सुरवातीला तपास आणि चौकशीच्या समांतर मुंबई आयआयटीकडून स्थापन करण्यात आलेली समिती सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करणार आहे. तर तपास होईपर्यंत डॉ. सूर्यनारायण डुल्ला यांना रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयआयटी-बॉम्बेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने वाकोडे यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची चौकशी करण्यासाठी १० सदस्यांची उच्च-स्तरीय समिती स्थापन केली आहे. 

दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना रजेवर जाण्यास सांगितले, त्यानंतर ही घोषणा करण्यात आलीये. समितीला आपला अहवाल एका आठवड्याच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अहवाल सादर झाल्यानंतर आणि तपास पूर्ण झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, मुंबई आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचाही विचार केला आणि राजीनाम्यांच्या मागणीव्यतिरिक्त इतर बहुतांश मागण्या मान्य केल्याचे समजते आहे. या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष प्रा. रमेश वेंकटेश्वरन असतील. या समितीमधील आयआयटी-बॉम्बेच्या सदस्यांमध्ये स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसचे प्रा. के. नारायणन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. संदीप कुमार साहा (जे संस्थेच्या एससी/एसटी विद्यार्थी आणि कर्मचारी कक्षाचे संयोजकही आहेत) तसेच रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा. दीप्ती कल्सी यांचा समावेश आहे.

डीनला जाब विचारला जाईल
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आयआयटी मुंबईचा पदवीधर साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणी संस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्सवर पोस्ट करताना सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आयआयटी मुंबई ही तपास यंत्रणा नाही. तरीही, कोणतीही स्वतंत्र चौकशी होण्यापूर्वीच विद्यार्थ्याच्या मृत्यूचा संबंध कथित परीक्षेतील फसवणुकीशी जोडणारे संस्थेचे सार्वजनिक विधान संस्थात्मकदृष्ट्या चुकीचे होते. मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सुजात आंबेडकर आता २३ सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटी बॉम्बे येथे दाखल होणार आहेत. वृत्तानुसार, ते २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयआयटी बॉम्बेच्या डीनची भेट घेऊन साहिल वाकोडे प्रकरणात संस्थेची भूमिका आणि जारी केलेल्या निवेदनावर प्रश्न विचारणार आहेत.