नवी दिल्ली : प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. मान्सूनची सुरुवात खराब झाली आहे. पावसाची गती मंद असली तरी, जून महिन्याचे पंधरा दिवस उलटूनही पावसात २५ टक्क्यांची तूट आहे. येत्या आठवड्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट असताना, काही ठिकाणी मान्सूनने वेग पकडला आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये पुढे सरकत आहे. आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मिझोरामसह १७ राज्यांसाठी वादळाचा इशारा जारी केला आहे.
अनेक दिवसांनंतर काही भागात चांगली प्रगती केली. परंतु, मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची वाट पाहावी लागेल. मुंबईत साधारणपणे ११ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की, देशाच्या बहुतांश भागात मान्सून अजूनही कमकुवत आहे. मान्सूनचा हंगाम १ जून रोजी सुरू होतो. या दोन आठवड्यांत देशात २८ टक्के कमी पाऊस झाला आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
पुढील ६-७ दिवसांत पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमधील अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेलंगणा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पुढील २-३ दिवस उष्णतेची लाट कायम राहील. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि ताशी ६० ते ८० किमी वेगाच्या वार्याचा इशारा दिला आहे. २० जूनपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनेक भागांमध्ये समुद्रात न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
दरम्यान, पश्चिमी वार्यांचा प्रवाह त्याच्या नेहमीच्या स्थितीपासून लक्षणीयरीत्या दक्षिणेकडे सरकला आहे. जोरदार पश्चिमी वार्यांचा वरच्या थरातील दाब ढग तयार होण्यास आणि टिकून राहण्यास प्रतिबंध करत आहे. दिलासादायक बाब ही आहे की हवामान अंदाज मॉडेलनुसार हे संकट कायमस्वरूपी नाही. १८ जून रोजी वायव्य भारतावर आणखी एक नवीन पश्चिमी प्रणाली सक्रिय होत आहे. १६ ते २१ जून दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.