भारताच्या भक्ती परंपरेच्या जागतिक कीर्तीचे श्रेय इस्कॉनला स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आध्यात्मिक वक्ते आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी १२ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या अदालत रोडवरील मधुवन केंद्राला भेट दिली आणि भक्तांना मार्गदर्शन केले.
अदालत रोडवरील इस्कॉन केंद्रात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे संध्याकाळी आगमन झाले. भक्तांनी हरे कृष्ण हरे राम महामंत्राच्या कीर्तनाने त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रथम त्यांनी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि त्यानंतर भक्तांना संबोधित केले.
ते म्हणाले की, मी भगवान रामाच्या एका परम भक्ताची कथा सांगण्यासाठी शहरात आलो होतो. त्यानंतर येथे इस्कॉनमध्ये भगवंताच्या भक्तांमध्ये येऊन मला अपार आनंद झाला आहे. इस्कॉनशी संबंधित अनेक अनुभव सांगताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, भारताच्या आध्यात्मिक विचारांचे, तत्त्वज्ञानाचे आज जे जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे आणि संपूर्ण विश्वात भक्तीपरंपरेचे जे गुणगान होत आहे त्याचे श्रेय इस्कॉन आणि त्याचे संस्थापक आचार्य श्रील अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना जाते.
ते पुढे म्हणाले की, त्यांना आपल्या जीवनात इस्कॉनचे संस्थापक आचार्य प्रभुपाद यांना प्रयागराज
येथे झालेल्या एका कुंभमेळ्यात भेटण्याची संधी मिळाली होती. भक्तांच्या संयम आणि समर्पणाची प्रशंसा करताना ते म्हणाले, खरा भक्त हा भगवंताच्या निःस्वार्थ सेवेत सदैव तत्पर असतो. तो भौतिक इच्छांपासून प्रभावित होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गोविंददेव गिरी महाराज यांचे इस्कॉन केंद्र प्रमुख डॉ. रमेश लड्डा, विनोद बगडिया आणि सुदर्शन पोटभरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अजीत टेकाडे यांनी केले. आयोजन यशस्वी करण्यासाठी रामनिवास गट्टानी, राम लड्डा यांच्यासह आदी भक्तांनी प्रयत्न केले. यावेळी सीए सत्यनारायण जाजू आणि सोनी यांची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions