अमेरिकेने ग्रीनलँडवर केला कब्जा तर रशियाही 'या' ७ देशांवर झेंडा फडकवणार?; जगात खळबळ

Foto
मॉस्को - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी डेन्मार्कसह नाटो देशांना धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी एक नकाशा जारी केला ज्यात त्यांनी ग्रीनलँड, व्हेनेझुएला आणि कॅनडाला अमेरिकेचा भाग असल्याचं दाखवले. ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेने युरोपातील नाटो देश चांगलेच भडकले आहेत. नाटो देशांनी त्यांचे सैनिक ग्रीनलँडला पाठवले आहे परंतु ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर अडून राहिलेत. त्यातच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे गुरु अलेक्झांडर डुगिन यांनी मोठं विधान केले आहे. ज्यारितीने अमेरिका ग्रीनलँडवर दावा करत आहेत, ते पाहता उद्या रशियाही जगातील ७ देशांवर कब्जा करण्याचा दावा करू शकते असं त्यांनी म्हटलं.

या ७ देशांमध्ये आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान हे संभाव्य लक्ष्य असण्याची शक्यता आहे. सोव्हिएत काळात हे सर्व रशियाच्या प्रभावाखालील भाग होते. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या जवळचे असलेले अलेक्झांडर डुगिन यांनी म्हटलंय की, ट्रम्प ज्या पद्धतीने ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यातून रशियालाही पूर्ण युरेशिया परिसरात आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष करत त्यांची जमीन वाढवण्याची संधी आहे. पाश्चात्य देशांना अनेकदा लक्ष्य करणारे अलेक्झांडर डुगिन यांनी आंतरराष्ट्रीय मानकांऐवजी बळजबरीने दावे निश्चित केले जात असतील तर अशा जगात रशियाला आपली विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी "काहीतरी भयानक" करावे लागेल असं सांगितले.

तसेच जागतिक सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर कब्जा करणे अमेरिकेसाठी आवश्यक आहे तर रशियालाही त्यांचा प्रादेशिक विस्तार करायला हवा. जर अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली नवीन प्रदेशावर दावा करत असेल तर रशियालाही हे करावे लागेल. केवळ क्रूरता, ताकद आणि व्यापक विनाश हे ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे आहे असंही अलेक्झांडर डुगिन यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा वारंवार दाखला देऊन सांगत होते.

दरम्यान, अलेक्झांडर डुगिन यांनी आर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान यासारख्या क्षेत्रांची यादी केली आणि रशियाने या क्षेत्रांमध्ये प्रभाव स्थापित करण्यासाठी हालचाल करावी असं म्हटलं. हे रशियाच्या वसाहतवादी प्रभावाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न म्हणून सादर केले पाहिजे. मॉस्कोने आंतरराष्ट्रीय कायद्याला मागे टाकून "युरेशियन मोनरो डॉक्ट्रिन" स्वीकारावे आणि अमेरिका, रशिया आणि चीनचे वर्चस्व असलेले जग स्वीकारावे असं डुगिन यांनी पुतिन यांना सल्ला दिला. 

मध्य आशिया आणि काकेशसमध्ये रशिया प्रभाव वाढवणार?

जर ट्रम्प म्हणतायेत की हा माझा प्रदेश आहे आणि तो अमेरिकन असेल, तर आपणही म्हणायला हवे की हा आमचा प्रदेश आहे, तो रशियन असेल. रशियाने मध्य आशिया आणि काकेशसमध्ये मोठ्या प्रमाणात आपला राजकीय, आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढवत राहावे. या प्रदेशातील लाखो लोक रशियामध्ये काम करतात आणि त्यांच्या देशांमध्ये पैसे पाठवतात. डुगिन यांनी बाल्टिक देश आणि मोल्दोव्हावर दबाव आणण्याविरुद्ध इशाराही दिला.