मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्यावरुन लक्ष्य केलंय. तसेच, निवडणुकांमध्ये आपणच मदत केल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत आमदार पाडू, असा इशाराच दिला. त्यानंतर, भाजप आमदारही पुढे आले असून जरांगे पाटील यांना चॅलेंज देत आहेत. आमदार प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना आव्हान दिलंय.
मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावेळी भाषण करताना, 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो' असे म्हणत सरकारला इशाराच दिलाय. त्यावर, आता प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. जीव घेऊ नका आणि देऊही देऊ ही नका मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला असेल, असे दरेकर यांनी म्हटले. तसेच, आमदार पाडण्याचा त्यांना आत्मविश्वास आहे. निवडणूक लढले असते तर ते दिसून आलं असतं. पण, त्यांनी विरोध करुनही जनतेने महायुतीला निवडून दिले. त्यामुळे, त्यांची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली आहे, पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर उमेदवार उभे करा, असे चॅलेंजच दरेकर यांनी जरांगे पाटील यांना दिले.
चंद्रशेखर बावनकुळे 18 पगड जातींना सोबत घेऊन चालण्याचा काम करत असतात. आम्हाला कधीच त्यांनी दुजाभाव केला नाही, सगळ्यांना बरोबर घेण्याची भूमिका त्यांनी घेतलेल्या निर्णयातून दिसून येते, असे म्हणत बावनकुळे यांचे समर्थन केले. तसेच, मनोज जरांगे पाटलांनी बावनकुळेंवर केलेल्या आरोपावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
लक्ष्मण हाके प्रसिद्धी लोलुप
दरम्यान, लक्ष्मण हाके संदर्भातील प्रश्नावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना टोला लगावला. निवडणूक आली की ते दिसतात, कधी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बोल कधी विरोधात बोल प्रसिद्धी लोलुप काही लोक असतात, असा टोला लक्ष्मण हाकेंना लगावला. समाजासाठी बोलताना आपण रचनात्मक समाजासाठी काय काम करतोय त्याला दिशा देण्याचे काम करतोय का हे बघायचं असतं. केवळ मीडियासमोर, एकमेकांसमोर भुंकायचं हे मला मान्य नाही, असेही दरेकर यांनी हाकेंवर बोलताना म्हटले.