व्हीव्हीपॅट नसेल तर थेट बॅलेटपेपरवर निवडणूक घ्या, उद्धव आणि राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे एकमुखी मागणी

Foto
मुंबई : राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या आक्रमकतेपुढे राज्य निवडणूक आयोगाची भांबेरी उडालेली दिसली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे, शेकाप यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना भांडावून सोडले. प्रश्‍नांच्या सरबत्तीने आयोगाचे अधिकारी गांगारून गेल्याचे दिसून आले. मतदार याद्यातील घोळावरील प्रश्‍नावरून आयोगाल या नेत्यांनी खिंडीत पकडल्याचे दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले. सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.  तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग हा काही हरिश्‍चंद्र नाही.  नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

तर यावेळी बाळासाहेब थोरात 8 टर्म 80-90 हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य असा सवाल राज ठाकरे यांनी केला. यावर निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाले. याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचे सांगा. निवडणूक पुढे ढकला. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

कालही शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली होती. तर आज आयुक्त वाघमारे यांना पण शिष्टमंडळाने धारेवर धरले. या शिष्टमंडळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, मनसे नेत बाळा नांदगावकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह बडे नेते हजर होते.

मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी आज राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी, आपले निवदेन देत अनेकांनी विविध प्रश्‍नांची सरबत्ती केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही 7 ते 8 महत्वाचे प्रश्‍न विचारले होते. त्यामध्ये, मतदार यादीत नाव नोंदवणे का बंद केले, नावे समाविष्ट करणे किंवा वगळण्याबाबतही प्रश्‍न होते. आता, यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण व उत्तर दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे.