लखनौ : दिवाळीत फटाक्यांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणावर होत असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकेला उत्तर दिले आहे. "लोकांनी मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली, हे खूप छान झाले. जर प्रदूषण झालेही असेल, तर ते संपून जाईल, त्याची काळजी करण्याचे कारण नाही," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी फटाके फोडण्याचे समर्थन केले आणि विरोधकांवर निशाणा साधला.
कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "काही लोक म्हणतात की दिवाळीमुळे प्रदूषण वाढले. पण ज्या लोकांनी भ्रष्टाचार संपूर्ण व्यवस्थाच दूषित करून टाकली, त्याबद्दल मात्र कोणीही बोलत नाही. जर सर्वसामान्यांनी वर्षभरातून एकदा आनंदाने फटाके फोडले तर लगेच प्रदूषण आठवायला लागते. जेव्हा काही वाईट घडत असते, तेव्हा कोणी काही बोलत नाही, पण जेव्हा लोक सण-उत्सव साजरे करत आनंद व्यक्त करतात, तेव्हाच काहींना प्रदूषण आठवतं." मी स्वतः अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी झालो होतो, असे सांगत सरकारने यंदा फटाके फोडण्यावर कोणतीही बंदी घातली नव्हती, असे त्यांनी म्हटलं.
मागील सरकारवर कडाडून टीका
यावेळी बोलताना त्यांनी २०१७ पूर्वीच्या काळाची आठवण करून दिली. "पूर्वीचे सरकार असताना होळी, दिवाळी, विजयादशमी, ईद किंवा इतर सणांच्या आधी राज्यात जाणीवपूर्वक दंगली घडवल्या जात होत्या आणि महिनाभर कर्फ्यू लावला जायचा. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचं. मात्र, गेल्या आठ वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल किंवा कर्फ्यू झालेला नाही, आणि सर्व सण शांततेत व उत्साहात साजरे केले जात आहेत," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
१,१४६ तरुणांना दिली नियुक्तीपत्रे
लखनऊ येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात महसूल विभागासाठी निवड झालेल्या १,१४६ कनिष्ठ सहाय्यकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना अंतर्गत ४,३०० हून अधिक लाभार्थ्यांना एकूण २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.