शिवी देणे गुन्हा असेल तर भाजपच्या बड्या मंत्र्यांविरुद्ध गुन्हे दाखल का केले जात नाहीत ? अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारला सवाल

Foto
छत्रपती संभाजीनगर :  जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणार्‍या मुलीने अखेर सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे. माझ्याकडून घडलेले कृत्य क्षमायोग्य नाही, परंतु मी देशवासीयांची माफी मागते. मी केलेल्या कृत्याची मला प्रचंड लाज वाटत आहे, असे तिने एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी उशिरा रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला होता. यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या काही दिवसांत ज्या मुलांनी मला आणि माझ्या आईला अत्यंत वाईट शब्दांत शिवीगाळ केली, त्या मुलांना जवळ करण्याची ही वेळ आहे. ही भरकटलेली मुले असून त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. पंतप्रधानांच्या  या व्हिडिओनंतर काही तासांतच रुचिका सिंग नाव असलेल्या या मुलीचा माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. नोएडा येथे राहणार्‍या रुचिका सिंगविरोधात एका सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक्सवरती पोस्ट करत त्या मुलीची बाजु घेत भाजपवरती आणि त्यांच्या आयटीसेलवरती हल्लाबोल केला आहे. 

 भाजपच्या त्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार?
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी आत्ताच पाहिले की एका मुलीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पहिली गोष्ट अशी की, जर तुम्ही शिवीगाळ केल्यामुळे गुन्हा दाखल करत असाल, तर भाजपच्या त्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार, जे इतक्या वर्षांपासून महिलांना ऑनलाइन अत्यंत घाणेरड्या शिव्या देत होते, त्या मुलींसाठी त्यांनी काय काय शब्द वापरले गेले, कुठूनही, कसल्याही प्रकारे ते महिलांचा आदर करत नव्हते आणि ते लोक अभिमानाने आपल्या बायोमध्ये     असे लिहायचे. अशा लोकांनी महिलांना अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार? आणि गोष्ट फक्त भाजप आयटी सेलपुरती मर्यादित नाही, तर त्यांचे खासदार रमेश बिधुडी यांनी एका सहखासदारासाठी कोणत्या शब्दांचा वापर केला होता, हे सर्वांना आठवतेच.

योगी आदित्यनाथ यांचाही एक व्हिडिओ आला होता....
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही एक व्हिडिओ आला होता, ज्यामध्ये त्यांनी एएनआयच्या कॅमेरामनला शिवीगाळ केली होती. तर नक्की काय चाललंय? या देशात दोन वेगवेगळे कायदे चालले आहेत का? तरुणांसाठी वेगळा कायदा आहे आणि भाजप व त्यांच्या नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे का? आणि शिवी देणे हा काही गुन्हा नाही. शिवी देणे हा गुन्हा नाही. जर कोणी शिवी देत असेल, तर ते वाईट असू शकते, ती एक वाईट गोष्ट असू शकते. मग तुम्ही त्याला समजवा, त्याला सांगा की शिवीगाळ करू नका; पण थेट गुन्हा कोणत्या आधारावर दाखल केला जात आहे? जर शिवीगाळ केल्यावर गुन्हे दाखल करायचे असतील, तर सर्वात जास्त गुन्हे हे भाजप आयटी सेलवर दाखल होतील; कारण महिलांना सर्वात जास्त घाणेरड्या शिव्या त्यांनीच दिल्या आहेत. तसेच भाजपच्या त्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतील, ज्यांनी इतक्या वर्षांपासून आणि अगदी संसदेच्या आतसुद्धा इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले जात नाहीत, असा सवाल दिपके यांनी केला आहे.