रायपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. जर समाजातील जातीवाद पूर्णपणे नष्ट झाला तर, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
आठवले म्हणाले, ""जातीच्या आधारावर आरक्षणाची तरतूद आहे. जर जातीयवाद संपुष्टात आला, तर आम्ही आरक्षण सोडून देण्यास तयार आहोत. जोवर जातीयवाद संपुष्टात येत नाही, तोवर आरक्षण कायम राहील." तत्पूर्वी, त्यांनी झारखंडमध्येही असाच दावा केला होता. ते रांची येथे म्हणाले होते, "जर जातीय व्यवस्था संपुष्टात आली, तर आम्ही आरक्षण सोडून देण्यास तयार आहोत."
...म्हणून महत्वाचे मानले जाते, आठवले यांचे विधान -
दरम्यान, दिल्ली येथील जंतर-मंतरवर 'आरक्षण हटाओ' मागणीला घेऊन आंदोलन झाली होती. यावेळी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तर, दुसऱ्या बाजूला, बिहारमध्ये ६५ टक्के कोटा लागू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आठवले यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विरोधी पक्षांवर निशाणा -
दरम्यान, आठवले यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य केली असून, २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधी खोटे दावे करून युवा पिढीची दिशाभूल करत असल्याचा आरोप आठवले यांनी केला.