अवैध गर्भलिंग निदान : गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नारेगाव गर्भपात प्रकरणाचा तपास करताना सिडको एमआयडीसी पोलिसांनी अवैध गभलिंग निदान व गर्भपाताच्या किटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी राहुल माणिकराव झोंड (२८. रा. मयूरपार्क) आणि सोमनाथ परसराम बारसे (३१, रा. कमळापूर, वाळूज) यांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून विदेशी बनावटीचे गर्भलिंग निदान यंत्र जप्त केले. आरोपींना न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नारेगाव गर्भलिंग प्रकरणातील फरार आरोपी डॉ. सतीश राजू सोनवणे (रा. जाधववाडी) हा गर्भलिंग निदानासाठी वापरत असलेले विदेशी बनावटीचे प्रोब मशीन घेऊन आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे हे पिसादेवी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने यांना मिळाली. त्यावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२०) सापळा रचला. आरोपी हे कारमधून पिसादेवी येथे येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
डॉ. सोनवणेची कबुली
पोलिसांनी झडती घेतली असता आरोपींकडे विदेशी बनावटीचे प्रोव मशीन आढळले. हे मशीन डॉ. सोनवणे याचे असल्याची कबुली त्यांनी दिली. यावरून नारेगाव गर्भपात प्रकरणात आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.