पैठण तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू

Foto
महसूल व पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

पैठण, (प्रतिनिधी) तालुक्यात जायकवाडी, निम्न बंधारा, जुने पैठण, वाघाडी, वडवाली, नायगाव, नायगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी या भागातील गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असून या वाळू नये न भरलेल्या हायवा, मिनी ट्रक, ट्रॅक्टर पाचोड, पैठण, एमआयडीसी, बिडकीन पोलीस स्टेशनच्या समोरून रात्रंदिवस वाहतूक करताना दिसून येत आहेत.


याकडे स्थानिक पोलीस प्रशासन तसेच तहसील प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे. वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळेच अवैध वाळू उपशाला मोकळे रान मिळत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या नियमांना हरताळ फासून वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक होत असल्यास त्यावर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्यक्षात धडक कारवाईची आवश्यकता आहे, अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरणाची हानी आणि नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैठण तालुक्यातील वाळू उपशाच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अवैध उत्खननाची ठिकाणे शोधून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारींचीही निष्पक्ष चौकशी करावी.

-- प्रशासन वरिष्ठांच्या रडारवर येणार का? -- 
पैठण तालुक्यातील अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे प्रभावी कारवाई करणार का, तसेच जबाबदार अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदी आदेश न काढता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून अवैध वाळू उपशाविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.