टेम्पोसह चालक ताब्यात
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर शहरांमध्ये डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सावता महाराज चौक, लगडवस्ती परिसरात पोलिसांनी तत्पर कारवाई करत गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
याप्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार संदीप धनसिंग गुसिंगे (पोलीस ठाणे गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, MH-20 GC-1590 क्रमांकाच्या छोटा टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 5 गोवंश जातीची जनावरे अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने विना अन्न-पाण्याची अमानुष पद्धतीने वाहतूक करताना आढळून आली.
टेम्पो चालक शाहरुख हनिफ कुरेशी (रा. परदेशीपुरा, गंगापूर) याच्याकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम तसेच प्राण्यांवर क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.
















