गंगापूर, (प्रतिनिधी) : गोवंश जातीच्या जनावरांची दाटीवाटीने आणि निर्दयतेने वाहतूक करणारी दोन टाटा सुपर कॅरी वाहने गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि. २५) पहाटे पकडली. या कारवाईत सहा गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, दोन्ही वाहनांसह एकूण अंदाजे ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन टाटा सुपर कॅरी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गंगापूर-लासूर स्टेशन रस्त्यावरील सह्याद्री हॉटेलसमोर नाकाबंदी करून दोन्ही वाहने थांबवली. पहिल्या वाहनाची (एमएच २० ईएल ३०१२) तपासणी केली असता त्यामध्ये तीन जर्सी गायी बांधलेल्या आढळल्या.
हे वाहन दानियल मुजीब शेख (२२, रा. सलाबतपूर, जि. अहिल्यानगर) चालवत होता. दुसऱ्या वाहनाची (एमएच १७ बीवाय ३४३९) तपासणी केली असता त्यामध्ये दोन गायी आणि एक गोन्हा अशी तीन जनावरे आढळली. हे वाहन अजम मन्नभाई शेख (५०, रा. सलाबतपूर, जि. अहिल्यानगर) चालवत होता. या जनावरांचा मालक शकूर ईसा शेख असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही वाहनांमध्ये जनावरांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नव्हती.












