छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा परिसरात उघडकीस आला. साईनगर भागातील एका घरावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवारी (दि.५) छापा टाकत दोन महिलांना प्रत्यक्ष गर्भपात करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील साईनगरमधील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसमोरील छाया बाबासाहेब जाधव (५५) यांच्या घरात हे बेकायदेशीर केंद्र सुरू होते. त्यांची मुलगी वर्षा जाधव (३०) आणि ऊर्मिला विठ्ठलराव गायकवाड (३२) या दोघी बहिणी मिळून अवैध गर्भपात केंद्र चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका डॉक्टराच्या माध्यमातून हा गर्भपाताचा अड्डा चालविल्याचे समोर आले. मात्र डॉक्टरची ओळख स्पष्ट झाली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी मनपाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधत संयुक्त पथक तयार केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. अमर ज्योती शिंदे, डॉ. सुनील पाटील, विधी सल्लागार रश्मी शिंदे तसेच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक निर्मला राख, गोविंद एकिलवाले, नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणातील रुग्णाचा पती रामदास माणिकराव घोडे (३३) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या रॅकेटमागे नर्स ज्योती भीमराव पवार (३०) हिचा हात असल्याचे उघड झाले.














