फुलंब्रीत तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करा

Foto
अतिवृष्टी अनुदान दिले नाही तर तीव्र जनआंदोलन : काँग्रेसचा इशारा

फुलंब्री, (प्रतिनिधी): तालुक्यात मका व कापूस ही प्रमुख नगदी पिके असून खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने मक्याला २४०० प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असतानाही अद्याप शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. उलट खरेदीसाठी जाचक अटी लादण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळे फुलंब्री तालुक्यातील मका, सोयाबीन, कापूस, फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेला शेतीमाल नष्ट झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जे काही पीक वाचले आहे ते व्यापारी अत्यंत कमी दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुका काँग्रेस, शेतकरी व विविध कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. 

तसेच कापूस व मक्याची हेक्टरी खरेदी मर्यादा वाढवावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई जाहीर करण्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

यासोबतच खताचे वाढलेले दर कमी करावेत, युरियाचा मुबलक पुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच गिरजा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा तात्काळ थांबवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्या तात्काळ शासन स्तरावर कळवून अमलात आणल्या नाहीत, तर खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्रीत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष मेटे,जगनाथ राव काळे, इद्रिस  पटेल, अश्विनी ज्ञानेश्वर जाधव, बापूराव डकले,मंगेश मेते, प्रदीप बेडके, ज्ञानेश्वर जाधव, रेखा राजेंद्र चव्हाण , प्रभाकर वाघ , कचरू मैदं , रवींद्र जंगले, वहाटूळे, गोविंद गायकवाड, सुभाष गायकवाड तसेच काँग्रेस व सेवादल पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.