तोतया पोलिसांनी वृद्ध कंत्राटदाराला लुटले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सैन्याचा ड्रेस, हातात बनावट ओळखपत्र आणि पोलीस असल्याचा आव आणत तिघा भामट्यांनी एका ८० वर्षीय कंत्राटदारास रस्त्यावरच लुटल्याची घटना दि. २५ रोजी घडली. मर्डरचा तपास सुरु आहे, असा बनाव करुन वृद्धाला अंगठ्या काढायला लावून क्षणार्धात त्या लंपास करत आरोपी पसार झाले.
याबाबत शिवाजी गैबी वाघ (८० रा. रामनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी हे वॉटरप्रूफिंगचे काम करतात. दि. २५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ते कमलनयन बजाज हॉस्पिटलसमोरील काम आटोपून मोपेडने घरी परतत होते. बीड बायपास रोडवरील पेन्टागॉन हॉस्पिटल परिसरात अचानक दोन जण दुचाकीवर तर एक जण स्कुटीवर त्यांच्या जवळ आले. तिघांनीही मिल्ट्रीचा ड्रेस परिधान केला होता. त्यांनी ओळखपत्र दाखवत स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. पुढे मर्डर झाला असून चेकिंग सुरू आहे, लगेच गाडी थांबवा व तुमच्या हातातील अंगठ्या काढून घ्या असे सांगितले. 
वाघ यांनी बोटातील अंगठ्या काढून खिशात टाकत  असताना तिघा भामट्यांनी खिशात टाकू नका, गाडीच्या डिक्कीत ठेवा असे सांगितले. गोंधळलेल्या वाघ यांनी त्यावर विश्वास ठेवून गाडीची डिक्की उघडून अंगठ्या डिक्कीत ठेवल्या. त्यानंतर तिघा भामट्यांनी आता तुम्ही गाडी चालू करुन जावू शकता असे म्हणाले. मात्र, वाघ निघण्यापूर्वी भामट्यांनी डिक्कीतील अंगठ्या काढून घेत दुचाकीवर बसून देवळाई चौकाच्या दिशेने वेगाने पसार झाले. संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की, वाघ यांना काहीच कळले नाही.