स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
सिल्लोड, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कनडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांनी आज आमदार अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संजना जाधव यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड सोयगाव आणि कन्नड तालुक्यातील निवडणूक रणनीती, स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती, संभाव्य उमेदवारांची निवड तसेच प्रधार यंत्रणेच्या बळकटीकरणावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस सिल्लोड, सोयगाव व कन्नड तालुक्यातील शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदार संजनाताई जाधव यांना साडी भेट देत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी कशी करता येईल, यादर आपापली मते मांडली.
स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि विकासकामांचा आढावा घेत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रचार करण्यावर भर देण्यात आला. उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकत्यांशी असलेले संबंध हे निकष समोर ठेवून इच्छुक उमेदवाराची चाचपनी योग्य रित्या करून जो निवडणूक येवू शकतो, त्याला उमेदवारी देणे तसेच कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे, बूध पातळीवर मजबूत संघटना उभी करणे आणि युवा तसेच महिला कार्यकत्यांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यावर दोन्ही आमदारांमध्ये एकमत झाले.
विरोधकांच्या रणनीतींवर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवण्यावरही चर्चा झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व घडवून आणत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















