नेपाळमध्ये ९०३ जणांचे मृतदेह हाती, ४,२४७ नागरिक अजूनही बेपत्ता; बोगद्यांमध्ये शेकडो मजूर अडकल्याची भीती

Foto
काठमांडू : नेपाळ आणि चीनच्या तिबेट सीमेवरुन आलेल्या  महापूरानंतर ६ दिवस उलटूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या प्रलयात मृतांचा आकडा तब्बल ९०३ वर पोहोचला असून ४,२४७ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.

रसुवा, नुवाकोट, धादिङ, गोरखा, नवलपरासी, तनहुँ आणि चितवन या ८ जिल्ह्यांमधून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. तसेच अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस शोधमोहीम राबवली जात आहे.

जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये शेकडो मजूर अडकले
या दुर्घटनेत सर्वाधिक फटका जलविद्युत प्रकल्पांना बसला आहे. अनेक प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये दगड-मातीचा ढिगारा साचल्याने शेकडो कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता असलेल्या ४,२४७ नागरिकांमध्ये जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित ९३३ कामगारांचा समावेश आहे. तसेच नेपाळ पोलिसांचे २५, सैन्याचे ४५, सशस्त्र पोलीस दलाचे १३, सीमाशुल्क ऑफिसचे १५ आणि इमिग्रेशन ऑफिसचे ३ कर्मचारी बेपत्ता आहेत.

रसुवामधील ८६५, नुवाकोटमधील १,५५८ नागरिक, ५९२ परदेशी नागरिक, परदेशी पर्यटकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिक, लांगटांग राष्ट्रीय उद्यानातील ३ आणि क्वारंटाईन ऑफिसमधील ३ कर्मचारीही बेपत्ता आहेत.