औरंगाबाद: आईला कंपनीत सोडायला जाणार्या मुलाच्या दुचाकीसमोर रस्त्यावर अचानक वराह धावत आल्याने दुचाकी घसरून आई जागीच ठार झाली तर मुलगा जखमी झाल्याची घटना आज सकाळी रांजणगाव भागात घडली.
कविता देवानंद थोरात वय-३६ (रा.रांजणगाव शेंनपुंजी, वाळूजमहानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मृत कविता या वाळूज औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामगार होत्या, नित्यप्रमाणे मुलगा त्यांना सोडण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जात असताना रांजणगावातील कमानीजवळ अचानकपणे रस्त्यावर वराह धावत दुचाकीच्या चाकाखाली आल्याने दुचाकी घसरली व पाठीमागे बसलेल्या कविता रस्त्यावर फेकल्या गेल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाल्या त्यांना मुलाने खाजगी वाहनाने तातडीने घाटी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.घाटीतिल वैद्यकीय अधिकार्याने तपासून कविता यांना मृत घोषित केले. या घटने प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाळूज औद्योगिक नगरीत अनेक ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता अनेकजण वराहपालन करीत आहेत.त्यामुळे परिसरात वराहची संख्या हजारोच्या घरात पोहोचली आहे. या वराह विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या मात्र कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.











