औरंगाबाद: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या औरंगाबाद (२६)आणि जालना (३५) जिल्ह्यातच चारा छावण्यांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे तुलनेने कमी दुष्काळ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात ९० चारा छावण्या सुरू आहेत. एकंदरीत प्रशासनाने या जिल्ह्यावर अन्यायच केला असे दिसते.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी जानेवारी महिन्यात शासनाने जीआर पाठवला. या जीआरमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने २५ लाख रुपये अनामत रक्कम म्हणून बँकेत जमा करण्याची अट टाकण्यात आली. दुष्काळग्रस्त भागासाठी ही अट जाचक ठरली. आर्थिकदृष्ट्या सबल नसलेल्या असंख्य प्रामाणिक संस्था चारा छावण्या सुरू करू शकल्या नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या २६ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. जेव्हा मराठवाड्यात सर्वाधिक ११५० टँकर्स याच जिल्ह्यात सुरू आहेत. तब्बल १०४१ गावे तीव्र पाणीटंचाईच्या फेऱ्यात आहेत. अशावेळी सर्वाधिक चारा छावण्या याच जिल्ह्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र पंचवीस लाखांची जाचक ठरली.
आता पाच लाखांचा निर्णय
दरम्यान, जानेवारी महिन्यात शासनाने २५ लाखांची टाकून अनेकांना चारा छावण्या पासून रोखले. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही अट शिथिल करून संस्थेने पाच लाखांचे डिपॉझिट द्यावे,असा दुसरा जीआर काढण्यात आला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या मर्यादितच राहिली.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक चारा छावण्या
चारा छावण्यांच्या बाबतीत मराठवाड्यात बीड जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्याला ९३३ चारा छावण्या मंजूर झाल्या. त्यापैकी ५९४ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ८७ हजार ४२७ जनावरे दाखल झाली आहेत. उस्मानाबाद जिल्हाही चारा छावण्या बाबतीत नशीबवान ठरला. या जिल्ह्यात अवघे २३३ टँकर सुरु आहेत, तर तब्बल ९० चारा छावण्या सुरु असून यात 75 हजार जनावरे दाखल झाली आहे.
औरंगाबाद- जालना जिल्ह्यावर अन्याय
सर्वाधिक पाणी टंचाई असलेले औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे चारा छावण्या बाबत कमनशिबी ठरले. औरंगाबाद जिल्ह्याला अवघ्या ६२ चारा छावण्या मंजूर झाल्या. त्यापैकी आतापर्यंत केवळ २६ चारा छावण्या सुरू होऊ शकल्या आहेत. यात २२७४१ जनावरे दाखल आहेत. जालना जिल्ह्याला ४८ चारा छावण्या मंजूर झाल्या त्यापैकी ३५ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यात १९ हजार ४४१ एवढी जनावरे दाखल झाली आहेत.
अन्याय झाल्याची भावना
दरम्यान सर्वधिक दुष्काळाची झळ पोहोचलेल्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात चारा छावण्यांना मंजुरी देताना सरकारने आखडता हात घेतला. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आणि टॅंकर सुरू आहेत. त्याच जिल्ह्यांत कमी चारा छावण्यांची मंजुरी देऊन प्रशासनाने अन्याय केला असे बोलले जाते. दुसरीकडे तुलनेने कमी टॅंकर असलेल्या जिल्ह्यात चारा छावण्यांची संख्या अधिक आहे, असे आकडेवारी सांगते.
















