राज्यात महायुतीची आघाडी तर महाविकास आघाडीची पिछाडी !! नगरपालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांची जादू कायम..

Foto
मुंबई : राज्यभरातील नगरपंचायत आणि नगर परिषदांचा निकाल आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि महायुतीनं आघाडी मारली आहे. २८८ पैकी २६७ जागांचे सुरुवातीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १११ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर ४८ जागांवर शिंदे गट, ४० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट, २० जागांवर काँग्रेस, १३ जागांवर शरद पवार गट तर ९ जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एक जादू बघायला मिळत आहे. भाजपा १२७ पदांवर आघाडीवर आहे.

एकूणच राज्यातील चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी सपशेल बॅकफुटला फेकली गेली आहे. बहुतांशी ठिकाणी महायुतीनं बाजी मारली आहे. अशात राज्यातील एकमेव नगरपालिका अशी राहिली आहे, जिथे भाजप सेना युतीला अद्याप भोपळाही फोडता आला नाही. ही नगरपालिका म्हणजे संगमनेर नगरपालिका. संगमनेरमध्ये थोरात तांबे गटाने निर्णायक आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या नगरपालिका आणि नगरपरिषदांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या सातारा, जळगाव, नाशिक आणि बीड यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला, याची माहिती समोर आली आहे. यावेळी अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्के बसले असून काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे व नाशिक विभागात महायुती आघाडीवर

सासवडमध्ये भाजपने आपले स्थान बळकट केले आहे. प्रभाग २ आणि ९ मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदी जगताप यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे.तर नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे विठ्ठलराजे उगले १०९८ मतांच्या आघाडीसह विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यासोबतच नांदगावमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीअखेर शिंदे गटाचे सागर हिरे (३४३६ मते) हे राजेश बनकर (१८१७ मते) यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने पुढे आहेत.

मराठवाड्याचा कौल कोणाला?

जालनाच्या परतूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा येथे निर्णायक ठरताना दिसत आहे. भाजपच्या प्रियांका राक्षे १३०० मतांनी आघाडीवर असून भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. येथे शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तसेच बीड जिल्ह्यात भाजपने सहापैकी चार ठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, माजलगावमध्ये शरद पवार गटाने मुसंडी मारली आहे. अंबाजोगाईत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढणारे अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी आघाडीवर आहेत. धरणगाव येथे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या शहर विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. लीलाबाई चौधरी ७५० मतांनी आघाडीवर आहेत. त्यसोबतच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील (शिंदे गट) यांनी भाजपच्या उमेदवार भावना महाजन यांना पिछाडीवर टाकले आहे. तर गोंदियामध्ये काँग्रेसचे सचिन सेंडे ३२०० मतांनी आघाडीवर असून त्यांनी भाजपच्या कशिश जयस्वाल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच चंद्रपूरमध्ये गडचांदूरमध्ये येथे अत्यंत चुरशीची परिस्थिती असून टपाली मतदानामध्ये काँग्रेसचे सचिन भोयर आणि भाजप बंडखोर निलेश ताजने यांना समसमान मते पडल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शंकरराव गडाखांना धक्का

तसेच राहाता नगरपालिकेत विखेंचा डंका पाहायला मिळत आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदी डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी महायुती २० पैकी १९ जागेवर विजयी झाली आहे. तर स्थानिक आघाडीला एकमेव जागा मिळाली आहे. त्यासोबतच नेवासा नगरपंचायतीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे डॉ.करणसिंह घुले विजयी झाले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाखांना धक्का बसला आहे. नगरसेवक पदाचे १० उमेदवार विजयी झाले आहे. मात्र त्यांनी नगराध्यक्ष पद गमावले आहे.

फडणवीसांनी भावाला बिनविरोध निवडून आणलं, पण ...

 मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे चर्चेत आलेल्या चिखलदरा नगरपरिषदेमध्ये धक्कादायक निकाल हाती आला आहे. चिखलदर्‍यात २० जागेपैकी १२ जागांवर काँग्रेसने विजयी मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मामेभावामुळे ही निवडणूक गाजली होती. पण काँग्रेसने या निवडणुकीत बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांनी माघार घेतली होती.

देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती

चिखलदरा नगरपालिकेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कलोती कुटुंबीयांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आल्हाद कलोती यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.

काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील यांनी माघार घेतल्याने आल्हाद कलोती यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं होतं. अशातच भाजपला मात्र गड राखता आला नाही. चिखलदर्‍याच्या विकासाला प्राधान्य देऊन रखडलेली विविध विकास कामं, पाणी पुरवठा समस्या आणी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा मानस आल्हाद कलोती यांनी व्यक्त केला आहे.