सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अंभई जिल्हा परिषद सर्कलमधील केळगाव येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कावले वस्ती ते सपकाळ वस्तीपर्यंत मंजूर केलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी अब्दुल आमेर यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने हा रस्ता मंजूर झाला असून, या कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्या येण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध व्हावा, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागातील दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अंभई सर्कलमधील विविध गावांच्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही अब्दुल आमेर यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामू अण्णा गव्हाणे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सोमेश गीते, शाखा अभियंता राजेश राजगुरू, नगरसेवक शेख इमरान उर्फ गुड्डू, बबलू पठाण, युवासेनेचे शिवा टोम्पे, रितेश जयस्वाल, अशोक वाघमोडे, अरविंद शिंदे, बद्रीनाथ कोठावळे, जगन्नाथ कावले, यादवराव जाधव, शेषराव कोल्हे, रोहिदास पवार, गजानन मुळे, किशोर शिंदे, योगेश विसपुते, गणेश डोईफोडे, गजानन चाथे, स्वप्निल शेळके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.