शेतवस्त्यांवर रात्रीची गस्त वाढवा : आ. बंब

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर-खुलताबाद विधानसभा
मतदारसंघातील ग्रामीण भागासह शेतवस्त्यांवर काही दिवसांपासून चोऱ्या आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी (ता. ३०) परिसरातील गंगापूर, खुलताबाद, शिल्लेगाव, वाळूज आणि एमआयडीसी वाळूज या पाचही पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना पत्र पाठवून रात्रीची गस्त तातडीने वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. 

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना शेंदूरवादा व लासूर गटातील बाभूळगाव, वाळूज परिसर तसेच खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत संताप व चिंता व्यक्त केली. 

शेतातील विजेच्या मोटारी, केबल्स, कृषी अवजारे आणि पशुधन चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी पिकांमध्ये जनावरे सोडून जाणीवपूर्वक नासधूस केली जात आहे. मुख्य गावांपासून शेतवस्त्या दूर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संवेदनशील भागांत नियमित व प्रभावी गस्त सुरू करावी, बीट अंमलदारांनी वस्तीवरील नागरिकांशी सतत समन्वय ठेवावा आणि गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे. 

या पत्राची प्रत पोलिस अधीक्षक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.