भारत मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर, देशाचा आर्थिक कणाच मोडला!; राहुल गांधींची अमेरिकेतून मोदी सरकारवर टीका

Foto
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, भारत एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. भारतात प्रचंड बेरोजगारी आहे, उत्पादन क्षेत्र कोलमडले आहे आणि शिक्षण क्षेत्रात असंख्य समस्या आहेत. मंगळवारी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी हे भाष्य केले. राहुल गांधी यांनी सांगितले, भारताच्या आर्थिक मॉडेलमधून मिळणारे फायदे सुमारे दहा वर्षांपूर्वीच थांबले आहेत. जर देश सध्याच्या आर्थिक मार्गावरच चालत राहिला तर गंभीर संकट ओढवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी म्हणाले, थोडक्यात सांगायचे तर, भारत एका आर्थिक आपत्तीच्या उंबरठ्यावर आहे. हीच वस्तुस्थिती आहे. कोणी याकडे दुर्लक्ष करेल, कदाचित प्रसारमाध्यमेही याकडे दुर्लक्ष करतील, परंतु भारतात मोठी बेरोजगारी आहे आणि शिक्षण व्यवस्थेतही गंभीर समस्या आहेत.

अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला
मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी म्हटले की, मेक इन इंडिया आणि स्टार्ट-अप इंडियासारख्या योजना देशाचा ङ्गमोडलेलाफ आर्थिक कणा पुन्हा सावरण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी सांगितले की, उत्पादन क्षेत्राची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, लघु व मध्यम उद्योग आणि कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि रोजगाराच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लघु व मध्यम उद्योग रोजगाराच्या निर्मितीचे इंजिन आहेत आणि कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण, अर्थव्यवस्थेचा हा कणाच मोडला आहेफफ, अशी टीका राहुल गांधींनी केली.

टाटा समूहातील संघर्षावर भाष्य
काँग्रेस पक्षाने गेल्या काही दशकांत उभारलेली आर्थिक रचना केंद्र सरकार कमकुवत करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. भारतात खाजगी गुंतवणूक का होत नाही? भारतात केवळ अदाणी आणि अंबानींसारखे व्यावसायिकच का प्रगती करत आहेत? टाटा समूहावर अक्षरशः अदाणींकडून ताबा का घेतला जात आहे? असे गांधी म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसने निर्माण केलेली आर्थिक रचना पुन्हा उभी करण्याची गरज आहे आणि एक भक्कम मॅन्युफॅक्चरिंग बेस असल्याशिवाय भारत यशस्वीपणे विकास करू शकत नाही.