पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे पायलट अभिनंदन वर्धमान यांची आज सुटका होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकिस्तान संसदेत केलेल्या भाषणात आपण विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अभिनंदन यांची आज सुटका होणे अपेक्षित आहे.
अभिनंदन यांची सुटका नक्की कधी होणार याविषयी नक्की माहिती कळू शकलेली नाही. मात्र, भारत अभिनंदन यांची दुपारपर्यंत सुटका करावी यासाठी आग्रही आहे. पाकिस्तान मात्र, बीटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान अभिनंदन यांना सोडणार असल्याचे समजते. सध्या विंग कमांडर इस्लामाबाद मध्ये असून सकाळी त्यांना लाहोर येथे आणले गेले. वाघ बॉर्डर वरून त्यांची सुटका होणार आहे.
भारताचा कूटनीतिक विजय...
पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यापासूनच भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच राष्ट्रांना विश्वासात घेत अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवला. भारताच्या दबावतंत्राचा अपेक्षित परिणाम पाहायला मिळाला व अभिनंदन यांच्या अटकेनंतर अवघ्या २४ तासातच पाकिस्तानला अभिमानदं यांच्या सुटकेची घोषणा करावी लागली.