हिंद महासागरातील इराणची युद्ध नौका बुडविल्यामुळे भारत श्रीलंकेतून टीकास्त्र

Foto
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचे पडसाद आता हिंद महासागरातही उमटताना दिसत आहेत. श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौका बुडवल्याची घटना समोर आल्यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान हिंद महासागरात इराणची युद्धनौका 'IRIS Dena' अमेरिकन पाणबुडीने टॉरपीडो डागून बुडवली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. महत्वाचे म्हणजे ही युद्धनौका भारतात आयोजित एका नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. भारत आपल्या सुमारे 80 टक्के ऊर्जा गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. हिंद महासागरातील वाढती लष्करी हालचाल जागतिक व्यापार मार्ग, तेल आणि ऊर्जा पुरवठा साखळी, समुद्री वाहतूक आणि विमा दरांवर परिणाम करू शकते. विरोधकांचा आरोप आहे की सरकारची भूमिका स्पष्ट न झाल्यास भारताच्या आर्थिक आणि रणनीतिक हितांवर परिणाम होऊ शकतो.

राहुल गांधी यांची टीका 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, 'लवकरच एक मोठे वादळ येणार आहे. जग सध्या अत्यंत अस्थिर काळातून जात आहे आणि भारतासाठी परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. भारताचा तेल पुरवठा धोक्यात आला आहे. भारतात येणाऱ्या तेलापैकी 40 टक्क्यांहून अधिक होमुर्झमार्गे येते.  'त्यामुळे या भागात वाढणारा संघर्ष भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. एलपीजी आणि एलएनजीच्या पुरवठ्याबाबतही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. लढाई आता आपल्या अंगणापर्यंत पोहोचली आहे. हिंद महासागरात इराणी जहाज बुडाले, तरीही पंतप्रधान शांत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला कारभारावर स्थिर हात हवा आहे. मात्र, भारताकडे एक तडजोड करणारा पंतप्रधान आहे, ज्यांनी आपली धोरणात्मक स्वायत्तता सोडून दिली,' अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

‘मिलान’ नौदल सरावाचा संदर्भ

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीदेखील या प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या इराणी युद्धनौकेवर हल्ला झाला, ती काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणममध्ये आयोजित भारतीय नौदलाच्या मिलान नौदल सरावात सहभागी झाली होती. 19 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान झालेल्या या बहुराष्ट्रीय सरावात ती जहाज भारताची ‘अतिथी’ होती. भारताच्या समुद्री क्षेत्रातून बाहेर पडताच त्या जहाजावर हल्ला होणे अत्यंत धक्कादायक आहे, असे रमेश यांनी म्हटले

श्रीलंकन खासदाराला वेगळीच शंका

मध्य पूर्वेतील तणावात हिंद महासागरात अमेरिकेने इराणच्या युद्धनौकेवर केलेला हल्ला भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी चिंताजनक आहे. हा हल्ला श्रीलंकेच्या दक्षिणी किनारपट्टीच्या आसपास आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात झाला. जो भाग श्रीलंकेच्या शोध आणि बचाव क्षेत्राच्या कक्षेत येतो. या बुडत्या जहाजातून ३२ इराणी कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. या घटनेनंतर आजही अनेक जण बेपत्ता आहेत अशी पुष्टी श्रीलंकेच्या नौदलाने केली. या घटनेवर श्रीलंकेतील खासदार नमल राजपक्षे म्हणाले की, ही घटना श्रीलंकेसाठी आणि हिंद महासागरासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. भारतासाठीही सुरक्षेच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे. युद्ध अनेक मैल दूरीवर होत आहे परंतु हिंद महासागरातील ही हालचाल श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून फक्त चाळीस नॉटिकल मैल अंतरावर आहे असं त्यांनी सांगितले.

इराणी युद्धनौकेवरील हल्ला भारतासाठी चिंतेची बाब का?

भारतासाठी ही घटना अतिशय महत्त्वाची आहे कारण हिंद महासागरात सागरी सुरक्षा, व्यापारी मार्ग आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. भारत आपल्या तेलाचा आवश्यक साठा याच सागरी मार्गाने आयात करतो. त्यामुळे कुठल्याही सैन्य संघर्षात या सागरी मार्गावरील वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. अमेरिकेच्या या कारवाईची आधी माहिती होती का याचे उत्तर श्रीलंकेच्या सरकारने द्यावे अशी मागणी खासदार नमल राजपक्षे यांनी केली आहे. अमेरिकेने अंधारात ठेवून ही कारवाई केली का याची जनतेला माहिती असावी असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, जर सरकारला याची माहिती होती मग त्यांनी जनतेपासून का लपवले? जर हल्ल्याची माहिती नसेल तर सागरी क्षेत्रात इतकी मोठी कारवाई कुठल्याही सूचनेशिवाय कशी झाली हा गंभीर प्रश्न आहे. भारत सरकार आणि दक्षिण आशियातील देशांनी हा मुद्दा गंभीरतेने घ्यायला हवा. प्रादेशिक स्तरावर यावर विचार करायला हवा असंही खासदार नमल राजपक्षे यांनी म्हटले .