फ्रान्समधील भीषण अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क! तेथील भारतीयांसाठी दूतावासाकडून महत्त्वाची अ‍ॅडव्हायझरी जारी

Foto
नवी दिल्ली :  फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनांसंदर्भात भारतही सतर्क आहे. भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देणारी सूचना बुधवारी जारी करण्यात आली. फ्रान्समधील मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलने आणि लुटमारीच्या घटनांनंतर, पॅरिस पोलिसांनी काही भागांमध्ये बुधवार रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून महागाईसह अनेक मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत.

फ्रान्समधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली आहे, यामध्ये म्हटले आहे की, फ्रान्समध्ये राहणार्‍या आणि प्रवास करणार्‍या भारतीय नागरिकांसाठी सूचना. सध्याची परिस्थिती आणि स्थानिक संचारबंदी लक्षात घेता, कृपया सतर्क राहा आणि खबरदारी घ्या. आंदोलनाची आणि गर्दीची ठिकाणे टाळा आणि स्थानिक अधिकार्‍यांच्या सूचनांचे पालन करा. स्थानिक बातम्यांद्वारे माहिती मिळवत रहा, अधिकृत अद्यतनांसाठी https://gouvernement.fr  तपासा आणि सार्वजनिक वाहतुकीतील कोणत्याही व्यत्ययाबद्दल https://ratp.fr  माहिती घ्या, असेही यामध्ये म्हटले आहे.

मदतीसाठी नंबरही केला प्रसिद्ध
आपत्कालीन फोन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. पॅरिसमधील दूतावासाशी +३३ ६ ४८ ३४ ०० ६३ या क्रमांकावर आणि [email protected] या ईमेलवर संपर्क साधता येतो. मार्सेलमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी +३३ ७ ४३ १६ २५ ५९ या क्रमांकावर आणि  [email protected]  या ईमेलवर संपर्क साधता येतो.

आंदोलने ग्रीसमध्ये पोहोचली
अनेक युरोपीय देशांमध्ये वाढत्या महागाईविरोधात सुरू असलेली आंदोलने बुधवारी ग्रीसमध्ये पोहोचली. सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी राजधानी अथेन्समध्ये हजारो विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरले.
आंदोलक वाढती महागाई, वाढता खर्च आणि शिक्षण बजेटमधील कपातीचा निषेध करत होते. या दरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. आंदोलक तरुण सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदी आणि शिक्षणातील कपातीचा निषेध करत आहेत. उच्च शिक्षण आणि विद्यापीठांसाठी नोंदणी शुल्क आणि फी वाढवण्याच्या निर्णयावरही ते संतप्त आहेत.