नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीयनगर येथील हौजरानी येथील हॉटेल कम रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अग्निकांडादरम्यान, अनेक जणांनी बाहेर उड्या मारून आपले प्राण वाचवले. ह़ॉटेलमध्ये आग लागल्यानंतर काही वेळातच ती सगळीकडे पसरली. तसेच हॉटेलचा संपूर्ण परिसर धुराने भरून गेल्याने आत अडकलेल्या अनेकांना स्वत:चा बचाव करण्यासाठी वाटही मिळाली नाही. दरम्यान, ही आग कशी लागली असावी याबाबत आता वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
ही आग हॉटेलच्या आत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि नंतर हॉटेलमध्ये पसरली, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर बघता बघता संपूर्ण हॉटेल आगीच्या ज्वाळा आणि धुराने वेढले गेले. तसेच तिसऱ्या मजल्यावर अडकलेले लोकही मदतीसाठी ओरडत होते. तसेच प्राण वाचवण्यासाठी वरूनच उज्या मारत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम हेसुद्धा या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये केवळ ६ खोल्या बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात येथे २५ खोल्यांचं बांधकाम करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर हॉटेलच्या बेसमेंटमध्येही काही खोल्या बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि मृतांची संख्या वाढली, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.