शेकडो झाडांच्या वृक्षतोडीवर व्यक्त केली खंत
खुलताबाद, (प्रतिनिधी): रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडणे सोपे आहे; मात्र वर्षानुवर्षे वाढलेले झाड पुन्हा उभे करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे विकासाच्या नावाखाली झाडांची अमानुष कत्तल करणे हा विकास नव्हे, अशी खंत आमदार प्रशांत बंब यांनी दौलताबाद परिसरातील शेकडो झाडांच्या वृक्षतोडीबाबत व्यक्त केली.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात १० हजार ५०० रोपांच्या लागवडीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. बंब बोलत होते.
दौलताबाद परिसरातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीचा संदर्भ देत आमदार बंब म्हणाले की, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे आवश्यक आहेत. मात्र त्यासाठी पर्यावरणाची मोठी हानी होणार असेल तर विकासकामांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. विकासकामे करताना झाडे वाचविण्याचे पर्याय शोधले पाहिजेत.
वृक्षलागवडीइतकेच अस्तित्वातील झाडे वाचविणे महत्त्वाचे वृक्षलागवड करणे जितके महत्त्वाचे आहे.
तितकेच अस्तित्वात असलेली झाडे वाचविणेही आवश्यक आहे. झाडे ही केवळ पर्यावरणाचा भाग नसून
पुढील पिढ्यांसाठीची नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे अनावश्यक वृक्षतोड थांबविणे, लागवड केलेल्या रोपांचे संगोपन करणे आणि परिसरातील वृक्षसंपदा जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन आमदार बंब यांनी केले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आर. डी. वलथरे, वनपाल एस. आर. मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रेखा चव्हाण, पंचायत समिती सभापती मंदाबाई वाकळे, नगर परिषद उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, परासराम बारगळ, उमेश आवारे, सचिन पवार, योगेश बारगळ, संजय खंडागळे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, ज्ञानेश्वर नलावडे, गणेश नाना आधाने, सतीश खंडागळे, ग्रामसेवक यकंट आदमवाड, जी. एस. गायकवाड, सरपंच रामहरी तुपे, उपसरपंच दत्तू चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














