टीसीएस धर्मांतर प्रकरणी मतीन पटेलसह हनीफ खानची निदाच्या कुटुंबासोबत चौकशी

Foto
नाशिक :  टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला आश्रय देणार्‍या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल तसेच घरमालक हनीफ खानची एसआयटीने चौथ्यांचा चौकशी केली. निदा खानची आई तसेच मावशीची देखील चौकशी करण्यात आली. निदाचे कुटुंबीय तसेच मतीन व हनीफने चौकशीदरम्यान वेगवेगळे दावे केले होते. त्यामुळे या सर्वांना समोरासमोर बसवून काही प्रश्न एसआयटीने विचारले.

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी निदा खान तब्बल ४० दिवस फरार होती. या काळात ती छत्रपती संभाजीनगर येथे लपून राहत असल्याचा तपासात उलगडा झाला होता. एसआयटीने शिताफीने कारवाई करत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या फरार काळातील हालचाली, संपर्क साखळी आणि आश्रयदात्यांचा शोध घेण्यावर तपास यंत्रणांनी भर दिला आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पटेल यांची चौथ्यांदा चौकशी करण्यात आली, तर घरमालक हनीफ खान यांची तिसर्‍यांदा चौकशी झाली. दुसरीकडे, निदाची आई आणि मावशी यांनाही याच आठवडचात दुसर्‍यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीदरम्यान एसआयटीने अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

निदाच्या जामिनावर आज सुनावणी
निदा खानने नाशिकरोडन्यायालयात दुसर्‍या गुन्ह्याप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.११) सुनावणी होणार आहे.  मागच्या दोन तारखांना सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. निदा गर्भवती असल्याने तिला जामीन मंजूर करावा, अशी सबब निदाने सांगितली असून अटकेच्या काळात निदाच्या आईला दररोज भेटण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.

विविध मुद्यांवर सखोल विचारणा
निदा खानचा मतीन पटेल यांच्याशी संपर्क नेमका कसा आला? हनीफ खान यांच्या घराची चावी निदाच्या ताब्यात कोणी दिली? निदा, मतीन आणि हनीफ यांच्यातील संबंधांचे स्वरूप काय होते? फरार काळात तिला आश्रय देण्यासाठी कोणाचा दबाव किंवा शिफारस होती का? तसेच निदाची मावशी घर भाड्याने घेण्यासाठी मतीन पटेल यांच्याकडे गेली होती, त्यामुळे या दोघांची पूर्वीपासून ओळख होती का, अशा विविध मुद्द्यांवर तपास अधिकार्‍यांनी सखोल विचारणा केली.