सोयगाव परिसरात नुकसानग्रस्त भागांची पाहणी; तीन दिवसांत भरपाई जमा होणार

Foto
सोयगाव, (प्रतिनिधी) सिल्लोड सोयगाव तालुक्यात गेल्या ८ दिवसापासून सातत्याने होत असलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची आमदार अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर, सोयगाव, काकराळा गाव शिवारात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे ज्यांची ई केवायसी प्रक्रिया झालेली आहे. त्या पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या ३ दिवसांत नुकसान भरपाईचे अनुदान जमा होणार असून यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा धीर मिळणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.

ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी बाकी आहे त्यांनी ईकेवायसी करून घ्यावी असे आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनारब्बी
पीक लागवडीसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव तालुक्यात शेतमाल सोबतच फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सततची अतिवृष्टी व त्यानंतर उरलेसुरले शेतमालाचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे त्यामुळे एकही नुकसानग्रस्त
शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसाने कापणी झालेल्या मकाच्या कणसाला कोंब फुटले, हातचा आलेला कापूस पावसाने भिजून नेस्तनाबूत झाला.

हातात आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी टाहो फोडत शासकीय मदतीची याचना केली. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेली परिस्थिती बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना माहिती दिली असे सांगत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

 या पाहणी दरम्यान नायब तहसीलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी शिवाजी यमूलवाड, तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी सभापती रामदास पालोदकर, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, सयाजीराव वाघ, गोपीचंद जाधव, संतोष बोडखे, अक्षय काळे, उस्मान पठाण, योगेश पाटील, विलास वराडे, रवींद्र बावसकर, शेख मुक्तार, शेख जाकेर, समाधान काळे, कदीर शहा, बंटी काळे, जीवन पाटील, दिलीप देसाई, कुणाल राजपूत, सुरेश चव्हाण, भारत तायडे, राधेश्याम जाधव, गजानन कुडके, लतीफ शहा, सलीम पठाण, उमरखा पठाण, शफीक पठाण, आदिंसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.