मोबाईलला गुरू न करता हरिनामाला जीवनाचा आधार बनवा : ह. भ. प. रामगिरी महाराज

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) अंगारकी चतुर्थीनिमित्त गंगापूर शहरातील विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, गंगापूर यांच्या वतीने ह.भ.प. गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

यावेळी कीर्तनातून मार्गदर्शन करताना ह. भ. प. रामगिरी महाराज म्हणाले, आज माणसाने मोबाईलला गुरू केले आहे. आणि देवाला विसरला आहे. सकाळी उठल्यानंतर हातात आधी मोबाईल येतो, माळ येत नाही. हरिनाम हे फुकटचे कर्ज आहे. हे कर्ज घेतल्याने व्याज लागत नाही, उलट जन्मोजन्मीचे कर्ज फिटते असे त्यांनी सांगितले.

अन्नदान हे सर्वांत मोठे दान असल्याचे सांगताना महाराजांनी सराला बेटावर शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या अन्नदानाचा उल्लेख केला. दररोज अन्नदानाची परंपरा अखंड सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संसारातील विविध - विषयांमुळे निर्माण होणाऱ्या व्यसनांपासून आणि दोषांपासून मुक्त होण्यासाठी कीर्तन, उपासना, ज्ञान व भगवंताचे नामचिंतन हा मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

निष्काम कर्माने दोष दूर होतात, उपासनेने चंचलता कमी होते, तर सगुरूंच्या कृपेने ज्ञानाचे आवरण दूर होते. मात्र भगवंताच्या नामचिंतनाने या सर्व दोषांचे शुद्धीकरण होते, असा संदेश त्यांनी दिला. गंगागिरी महाराजांनीही याच मार्गाचे मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, नगरसेवक  संतोष अंबिलवादे, राकेश कळसकर, नवनाथ कानडे, वाल्मीक शिरसाट, डॉ. आबासाहेब सिरसाठ, अरुण वाकडे, मनीष वर्मा, यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-- हरिनामाला जीवनाचा आधार बनवा -- 
मोबाईलच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर रामगिरी महाराजांनी दिलेला ङ्गसकाळी उठल्यावर मोबाईलऐवजी माळ हातात घ्याफ हा संदेश उपस्थित भाविकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरला.