नेपाळमध्ये पळून जाण्याचा इरादा होता, १५ मिनिटांच्या सापळ्यात कोटा पोलिसांनी आरोपींना केली अटक

Foto
 कोटा - अभिनेता टायगर श्रॉफवरगोळीबार केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. यात पोलिसांना मोठे यश मिळाले. मुंबईत गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपी राजस्थानच्या कोटा येथे अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांकडून सूचना मिळताच डीएसपी आणि सायबर सेलने अवघ्या १५ मिनिटांत जाळे पसरवले आणि संपूर्ण ट्रेनमध्ये शोध मोहीम घेत तिघांना पकडले. हे तिन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते असं पोलिसांनी सांगितले.

राजस्थान पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसपी यांनी सांगितले की, सोनीपतचा रेहान, बिहारचा ऋतिक उर्फ रोशन आणि एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात आले आहे. आरोपींकडून कुठलेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही. परंतु चौकशी सुरू आहे. आरोपींना शस्त्रे कुठून मिळाली याचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर आरोपीला दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीतून ते नेपाळला पळण्याच्या तयारीत होते. 

तसेच या घटनेतील रेहान हा मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितले. रेहान अनिल पंडितच्या संपर्कात होता. त्यानेच सर्व प्लॅनिंग पूर्ण केले होते. आरोपींकडून मिळालेली माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून तपासात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. हे तिन्ही आरोपी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होते. 

कोण आहे अनिल पंडित?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमधून करण्यात आला. अनिल पंडित याने ही पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल पंडित हा हरियाणातील पानिपत परिसरातील रहिवासी असून, संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली, हरियाणा आणि मुंबईतील काही हायप्रोफाइल गोळीबाराच्या घटनांशीही त्याचे नाव जोडले गेले आहे. जून २०२६ मध्ये दिल्लीत पंजाबी अभिनेता आणि गायक गुरू रंधावा याच्यावर व्यायामशाळेत गोळीबार झाला होता. याचीही जबाबदारी पंडितने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्वीकारल्याचे सांगितले जाते.